गावाकडची दिवाळी....

सौरभ गो हटकर

पुण्या-मुंबई शहरात काम करणारे गावातील लोकं आपल्या चारचाक्या घेऊन दिवाळीला गावात येतात.

त्यांच्या गाड्यांची चाके गावातील रस्त्यावरील माती उडवित घराकडं वळतात…तोपर्यंत गावातील सर्व लोकांच्या नजरा चारचाकीवर पडतात…पारावर बसलेली लोकं त्याने चारचाकी घेतली,फ्लॕट घेतला..अशी.कुजबुज करतात….

काही सिनियर सिटीजन “एकवेळ ह्याला त चड्डी सावरायची सोय नव्हती” पासून “ह्याला त भोंगळा फिरतांना पाहिला मी …अन आज बघा कसा झालांय” असं म्हणतात ….

तर समवयस्क शाळेत मी कसा झोडपला…तो कसा पुड्या आणून द्यायचा…अभ्यासात माझ्यापेक्षा कृमीच हुशार असायचा तरी बघ आज कसा मोठा झालांय…वगैरे वगैरे चर्चा करतात….

घरात गेल्या गेल्या आई-आज्जी नवलाईने नातवंडाना जवळ घेतात….ती शहरी नातवंडही नाजूकच असतात…त्यांच हँडवाशशिवाय काहीच जमत नाही….नाही त मग लगेच ‘क्ष्क्षाँ’सुरू होऊन इनफेक्शन ची भीती असते.

त्यांना थोडंही खरचटलं की सॕव्हलाॕन-डेटाॕल कधी नव्हे ते घरात उपलब्ध असतं…
अख्ख घरं शहरी नातवंडांच्या मागे सुरक्षिततेसाठी तैनात असतं…

दुसरीकडे गावठी नातवंडं बंड्या बिंड्याला घरातले जवळपासही फिरकू देत नाही.(बंड्या एका दिवसात ‘छी इडीयट’ ऐवजी *य घाल्या ,+चा,ची,चे विशेषणे लावून देणार्या शिव्या शिकविण्याची दाट शक्यता असते) तसेच
ह्यो गावभर लोळून येतो म्हणून त्याला लांबच ठेवल्या जातं.

तसा गावठी बंड्याला इंनफेक्शन बिक्शन,अँटीसेप्टीक बिक्टिक काही माहितंच नसतं…..ह्यो नालीतील बाॕल काढण्यापासून त टायराचा चक्का दामटे पर्यंत मनसोक्त खेळत असतो….जगत असतो..

पडला…आपटला..फुटला तर पहिला माण दणक्यांचा अन मग जखमेवर खोबरेल तेलाच्या थेंबाचा असतो…
हँडवाश त बंड्याच्या नशिबीच नसतो..आठआण्याचा चिक शांपू दोन दिवस पुरविने यातच त्याला जग जिंकल्यागत होतं…

शहरी नातवंडांच्या फाडफाड इंग्रजी बोलण्याच फार कौतूक होत असतं…अन तिकडं बंड्याला बापाचं मराठीत नाव वाचायला लावलं की..त्याचं सुरू होतं…क ला काना का…ळ ला काना ळा…र ला काना रा ..मगरीचा म…’काळाराम’..तोपर्यंत त्याच्यापाठीवर दणका बसून ‘शिक काही ह्यांच्याकडून’ अशी शाबासकी मिळते..

मातीने मळकट मनानी अन शरीरानी दणकट अशी मशागतीची सुरूवात बंड्याची इथूनच होत असते ……..

शहरी सुनेला विशेष मान घर गल्लीत मिळत असतो.
तुळशीबागेतील तिच्या चपलांपासून त साडी,वाशिंग मशिन वगैरे पर्यंत बायका आजच्या सवाल सारख्या चर्चा करतात…..किती नशिबवान म्हणून मनातल्या मनात स्वतःला दोषही देत असतील….इथं गावात ढिगभर कपडी धुवून,दिवसरात्र काम करूनही नशिबी चैन नाही की कौतुक नाही..

अन दुसरीकडं जाऊ चं नशिब किती मोठं….घर झाडायला बाई…कपडे धुवायला मशिन..अन वरून सासुबाईने दिलेला मानमरातब वेगळाच…..

शेवटी लक्ष्मीपुजनानंतर गावातील गाड्या धुळ उडवित शहराकडे परत निघतात…..पण यावेळेस धुळ फक्त रस्त्यावर नसते तर बंड्याच्या बापाच्या मनातही उठलेली असते.आपली पोरं शिकली पाहिजे..नाही कधी विकेंड,शाॕपिंग तरी निदान 6 महिने सालातून बायकोला साडी चोळी घेतली गेली पाहिजे….बंड्याला चांगल्या शाळेत घातला पाहिजे..आपला बंड्याही शिकला पाहिजे…त्याने तरी का वावरात मरमर करून आयुष्य मातीत घालायचं….असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यातील धुळ उठवून त्याच्या आत चिंगारी पेटवित असतात…

ती जलन शहरी बंधूच्या प्रगतीची नसते..तर स्वतःच्या परिस्थितीची चिड असते…

आता फक्त शहरातील तन्मयच्या वडिलांनी त्या चिंगारीची मशाल करण्याकरिता “तु बंड्याचं 5 वी पर्यंत शिक्षण गावात कर मग आपण त्याला पुण्या/मुंबईत टाकू” एवढी कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज असते…….

शेवटी तन्मयच्या वडिलांना शिकवून समृद्ध करण्यासाठी बंड्याच्या बापानी स्वःताच्या आयुष्याचे कित्येक ‘दांड’ फोडलेले असतातच….

सौरभ गो हटकर

हिवरखेड ता.खामगांव,बुलढाणा
9604079143

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता