मी,नेमाडेंचं कोसला अन 'ते'....

मी,नेमाडेंचं कोसला अन 'ते'....

पासपोर्ट चे काम आटोपून 12  april 2018 ला नागपुरच्या रेल्वे स्थानकावर सकाळीच 6-6:30,ची रेल्वे पकडण्यासाठी अर्धवट झोपेत पोहोचलो......
स्थानकात गेल्यावर बघतो तर काय?सकाळच्या  सर्व गाड्या 4-5 तासाच्या अंतराने उशिरा येणार म्हणून मनाला क्षीण आला...
एकतर खिशात पोटभर सोय लावण्यासाठी भरपूर पैसेही नव्हतेच..अन त्यात रेल्वे ची वाट पाहणं(तसंही आयुष्यात आपण कधी कुणाची कधी वाट पाहिलीच नसल्यामुळे,त्यातील व्याकुळता रेल्वेच्या निमित्ताने अनुभवता आली.)
मग तेवढी 10:30 च्या आसपासची  महाराष्ट्र एक्सप्रेस पकडून मी शेगांव प्रवासाला निघालो....
नेहमीप्रमाणे जनरल डब्याच्या बोगीत जनरल भारत कोंबलेला होताच....एकतर सकाळ पासून खिशातील मर्यादित पैशांमुळे पोट पाठीला चिकटलं होतं...मनात चिड ,डोळ्यावर झोपही होती..अन त्यात श्वास घ्यायला उबग आणनारी गर्दी पाय ठेवायलाही जागा द्यायला तयार नव्हती...
मी भयंकर त्रासलो...कसातरी शिव्या बिव्या घालत रेटत खेटत उभं राहायची जागा शोधून कसाबसा दोन पायावर उभा राहिलो...पण पंचाईत अशी की 5-6 तासाचा प्रवास असाच कंटाळवाणा उभं राहून करायचा तरी कसा??...
त्यात गाणे ऐकण्यासाठी मोबाईल मधे चार्ज पण नव्हती...
मग नागपूरच्या बर्डीतून भालचंद्र नेमाडेंचे अर्ध्या किमतीत घेतलेलं 'कोसला' आठवलं...ते काढलं अन सूरु आपलं 'उदाहरणार्थ -वगैरे'..
कसलं भारी आहे नं कोसला...50 वर्षापुर्वी लिहीलेलं असलं तरी अगदी आजही ते 25 वीशी मधल्या माझ्यासारख्याची अस्वस्थता घेऊन उभं असलेलं दिसतं....त्या अस्वस्थतेत स्वःताला शोधत वाचत चाललो होतो..

तेवढ्यात टाळ्यांचा आवाज आला...
मी बोगीच्या मधे असल्यामुळे 'ते' माझ्या दृष्टीक्षेपात नव्हते पण गेट जवळील 'आयेरे ' अन हासण्याच्या त्यांच्या छटेवरून कोण आले ते मला कळून चुकलं.....

ती,तो की 'ते' काय म्हणू मला माहित नाही...पण जनरली सोनी,पिंकी असंच काही  तरी नाव असतात त्यांची असं गृहीत धरून पुढं लिहीतोय...
तर त्या दोघी होत्या....
'हरामजादे पोलिस सालोंने हकालदिया उदरसे' असं जोरजोरात म्हणत त्या हसत हसत  मी असलेल्या बोगी क्रमांक 2मधे चढल्या...पानाने तोंड लाल झालेल्या अन घातलेली साडी अर्धवट टोंगळ्यापर्यंत खोसलेल्या अवस्थेत त्या एकाएका जवळ येत 'चल रे चिकने.. निकाल पैसे' म्हणत म्हणत पुढे सरकायच्या..
कुणी  पैसासाठी टाळाटाळ करायचा तर त्या अगदी त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गालावरून हात फिरवायच्या तर कधी गालावरच मुका घेऊन वादळापुर्वीची वार्निंग द्यायच्या...पण कुणी कुणी खूपच कट्टर असायचा तेव्हा त्याला खोसलेली साडी पुर्ण वर करून पैसे देण्यास बाध्यही करायच्या...
एकेकाला पैसे मागत मागत त्यातील एक माझ्याजवळ येत होती याची चाहूल मला लागली...माझ्याकडे मोजकेच पैसे होते त्यामुळे खरंतर मला पैसे देणे टाळायचेच होते...काय आपलं ह्या उतरल्या की पुढून आणखी कोणीतरी येणार...सगळ्यांनाच जर पैसे देणार तर घरी तरी कसं पोहोचणार म्हणून मी पैसे न देण्यावर ठाम होतो..
पण मी आपलं कोसलात डोकं घालून कधी नजर त्यांच्याकडे कधी पुस्तकात घालत वेळ घालवत उभा होतो.....
माझ्या पाया जवळच एक नुकतीच बाळांतीण झालेली बाई आपल्या तान्हूल्याला आपल्या पदराखाली झाकून स्तनपान करीत होती...
पण सततच्या ये जा करणार्यांमुळे तिला ते काय आॕकवर्ड वगैरे फिल होत होतं...बसायालाही ठिक नव्हतंच

अशातच ती सोनी,पिंकी वैगैरे जे काही नाव असंल ती जवळ आली....
मला पैसे मागितले ..मी पुस्तकात डोके घालून दुर्लक्ष करून उभा होतो...तिने लगेच गालावर हात फिरवून ' पड पडके कितना पडेगा रे चिकने,चल पैसे निकाल' असं म्हटली(बरं झालं माझी हाईट उंच असल्यामुळे तिला फक्त हातच फिरवता आला)
मी हातातलं कोसला बाजूला केलं ,तिच्याकडे बघितलं अन तिच्या हातात कोसला ठेवलं...
तीने अन आजूबाजूच्यांनी माझ्याकडे आश्चर्याने  बघितलं...मी मनात पुस्तकाने मस्तक बिस्तक सुधारते वगैरेच्या अविर्भावात तिला म्हटलो "तु जितना मांग रही उससे बहोत ज्यादा किमती चिज तुझे दे रहा हू...पैसे नही मेरे पास...यही लेके जा...."
ती हसत म्हटली पगला गया तूँ...भला मै ये किताब लेके क्या करू...अब क्या मेरे पढने की उमर है ये?
मी म्हटलो..घेऊन जा...वाच ..कदाचित तूला वाचायची सवय लागेल...त्यातून तुला तुझ्या सोबतच्या अन्याय बिन्यायाची जाण होऊन तू बी व्यवस्थेविरोधात बंड वगैरे करायची प्रेरणा मिळालीच तर तुझ्यात ही तुमच्यातला क्रांतीकारक निर्माण होईल...ती म्हणली ते कसा? मी म्हणलो तुमच्यातला उदाहरणार्थ 'मी लक्ष्मी मी हिजडा वगैरे सारखी' बोलणारी...तुमच्यासाठी लढणारी...ती हसली अन तू सचमे पागल है रे बाबा वगैरे..म्हणत हसत हसत पैसे न घेता समोर गेली.....

माझ्या समोरच्या सिट वर पैसे मागत असतांना तिचे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या त्या बाळंतण बाई कडं गेलं.....'ती'ने त्या बाईच्या कुचंबनेला ओळखले...मग तिला उठवले अन समोरच्या सिटवर बसलेल्या तरूण पोरांपैकी एकाला शिव्या हासडत ओढून उभे केले अन म्हटली"मर्द होके भी एक औरत को बैठे हुए देखते तुम्हे शरम नही आती क्या..?? कैसे मर्द हो तूम.. जो औरत की इज्जत नही जानता?मर्द होतो औरत की इज्जत करना सिखो...चल ऊठो सालो" असं काही बिही म्हणत तिने त्याला उठवलंच आणि "ताई यहा बैठो आप" म्हणत त्या बाईला सन्मानाने जागाही करून दिली....
हे पाहून आजूबाजूच्या अनेक मदतीसाठी आसुसलेल्या महिलांनी तिची मदत घेतली..

तीने अगदी सहज मर्दानगीची व्याख्या सांगितली...मी ते पाहून चक्रावलो....
एकतर आपला समाज 'त्यांना'धड  पुरूषात नाही अन बाईत ही नाही म्हणत अपमानित करत असतो ,त्यांना संविधानाने अन निसर्गाने दिलेला जागण्याचा हक्क ही नाकारत असतोच पण स्वतःच्या पुरूषार्थाच्या बढाया मात्र वेगवेगळ्या पातळ्यांवर करत असतो.पण दुसरीकडे तोच समाज आसिफा वर बलात्कार झाला तर आपली मुर्दुमकी पहिल्यांदा पिडितेची जात,धर्म बघायला घालवतो अन मग उठाव निषेधाचे ठरवितो.. ...हे मात्र दुर्दैवी आहे..
अन म्हणून न कळत हात खिशात जाऊन तिच्या हातावर 10 ची नोट ठेवण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.
(जसे आधी ती मागत असलेल्या पैशांपेक्षा मी दिलेलं पुस्तक लाखमोलाचं वाटत होतं,अगदी तसंच तीने केलेलं कार्य मी दिलेल्या नोटेपेक्षा कितीतरी पटीने लाखमोलाचं होतं याची मला जाणिव होतीच)

सौरभ हटकर
खामगांव,बुलढाणा.
9604079143
#भटका.

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता