06 Dec...


मोहम्मद माझा खास दोस्त,अगदी हक्काने खिरखुर्मा सांगावा अन नाही आणला तर हक्काने शिव्या खाणारा मित्र.त्याचंही वय माझ्या वयाइतकंच म्हणून 
वयाच्या 23 व्या वर्षी लग्न झालेल्या मोहम्मदची'हनिमुन' वरून मजा घ्या की,Family planning future वरून.तो हसूनच उत्तर देणार.
घरून चिकन आणनार,तर कधी-कधी त्याच्या शेतातही जेवायला नेणार......इतका जवळचा तो दोस्त.
तसाच आमच्या मैत्रीत सोबतीला तिसरा असणारा 'राम' ही आहे.
राम सुद्धा तितकाच जिगरबाज....
आम्हा सर्वांना एकमेकांची दुःखे समान अन स्वतःची वाटतात.
पैसे संपो की मुड खराब असो की चहा पाजायचा प्रश्न असो....प्रत्येकजण जबाबदारी पार पाडायला आवर्जून  पुढे  असतो.आमचे डबे शेअरींग करून खातानांचा आनंदच निराळा असल्याचा,अनुभव नेहमी प्रत्ययास येतो.
म्हणूनच कदाचित आम्हाला
कधीही  तो..'तो' आहे असं वाटलं नाही,अन मोहम्मदनेही कधी आम्हाला  वो...'वो' है असं जाणवू दिलं नाही.

खरंतर आमची मैत्री भारताच्या तिरंग्या सारखी बहूरंगी पण तितकीच एकरूप आहे..
नव्हे आम्ही 'आमच्यातच' ईतके मिसळलोय अन  इतके एकरूप झालोय की,सारा देश असा वागला तर धर्माच्या नावाने उभ्या केल्या जाणार्या द्वेषाच्या भिंतीना उभे राहण्यासाठी जागाच मिळणार नाही....
पण......
वर्षातला एकदिवस असा येतो की,त्या दिवशी मला प्रचंड ताण येतो.अन
त्यादिवशी मला दोघेही नकोसे वाटतात....तो दिवस म्हणजे 06 डिसें .

एकमेकांच्या whats ap status वरून एकमेकांची खेचून मजा घेणारे दोघेही,त्या दिवशी एकमेकांची जिरविण्यासाठी टपलेले असतात.
एक 06 डिसेंबर ला काळा दिवस म्हणून निषेध करतो,तर एक शौर्य दिन म्हणून उदो उदो करतांना कुत्सित हास्य अन दंडाच्या स्माईली सोबत भगवा झेंडा टाकून 'वही बनायेंगे'अस लिहीतो....
मला वाटतं माझा भारत सुरूवातीला वर्णन केल्या सारखा राम-मोहम्मदाच्या उदात्त मिश्र संस्कृतीचा आहे.पण त्या मिश्र संस्कृतीला वेगळे करून स्वस्वार्थ साधू ईच्छिनार्या अनेकांनी मोहम्मदाला अन रामाला कधी एकत्रच येऊ दिले नाही.
या देशाचे वैभव राम अन मोहम्मदाची मैत्री असतांना,ती शत्रुत्वात परावर्तीत करण्यासाठी अशा दिवसांची आवर्जून वाट पाहणारे शेकडो आहेत. त्याचा प्रभावही असा होतो की,वर्षभर टिकवलेला सलोखा , त्या एका दिवसामुळे फाटून जातो.अन देश तुटून जातो.
जिथं जेवतांना,फिरतांना..राहतांना विटाळ होत नसतांना,त्या एके दिनी सर्व बिनसून जातं..
मुळातच राम असो की मोहम्मद दोघांचेही वय 23-24 असतांना,त्यांच्या जन्माआधी घडून गेलेल्या कटू गोष्टींची जाणिव त्यांच्या मणात सतत जागृत ठेवणार्यांनी,दोघांच्याही बुद्धीवर 'हम खतरे मे है'चे फतवे व्यवस्थित  रूजवून ठेवले आहे.
त्यामुळे निर्माण केल्या गेलेल्या आभासी असुरक्षिततेमुळेच समतेच्या वाकळीला द्वेषाची ठिगळं चिकटत आहे.

राहिला प्रश्न 'बनायेंगेचा' तर 'तिथं' कुणालाच काही बांधायचे नाही अन काही करायचेही नाही.तर त्या जागेला सोन्याची  अंडे देणारी कोंबडी म्हणून सर्वांना वापरायची आहे.
त्यामुळे आता राम अन मोहम्मदाने विवेकाने विचार करून,वर्षभराच्या नैसर्गिक सलोख्याला त्या 'एका' दिवसामुळे आणखी किती पिढ्यांना, आस्मितांचे भांडवल करणार्यांच्या हातातील बाहूले बनवायचे हे ठरवलं पाहिजे.....

बाकी अशावेळी मला मध्ययुगीन काळातील राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचे कार्य हिमालया येवढं महान वाटतं.ते यासाठी की त्यांनी त्या काळात आजूबाजूला सर्व मुस्लिम शासक असतांना सुद्धा,बहुसंख्य हिंदूच्या भावना जपतांना अयोध्येत राम मंदीर  बांधले. अर्थात त्यासाठी हेतूशुद्धताच असावी लागते. अन ती अहिल्याबाईंसारख्या  महान शासका कडे होतीच...हे वेगळे सांगायला नकोच.......

✍🏻सौरभ हटकर(खामगांव जि बुलढाणा)
9604079143
💡⚜saurabhhatkar.blogspot.com 💡

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .