म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .

 


10 मे 2023 रोजी प्रकाशित


चित्रपट रिव्ह्यू.


अमर देवकर लिखित आणि दिग्दर्शित ' म्होरक्या ' हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला असून, नुकताच अमेझॉन प्राईम या OTT platform वर उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट बघितला , पण कॉलेज कामानिमित्त त्यावर लिहू शकलो नाही. सध्या निवांत असल्यामुळे पुन्हा एकदा चित्रपट बघून ,  मेंढपाळपुत्राच्या नजरेतून हे विश्लेषण  लिहीत आहे. 


म्होरक्या हा चित्रपट जरी आश्या(मेंढपाळ मुलगा ) आणि त्याचे शिक्षण या मेंढपाळ पुत्राच्या संघर्षा भोवती  फिरत असला तरीही तो तितकाच मर्यादित नाही ,ज्या समाजातून मी येतो, त्या मेंढपाळ धनगर  समाजाचा विविध पातळीवरचा संघर्ष चित्रपटाने दाखविलेला आहे.


चित्रपटाची सुरुवात, अशोक नावाच्या मेंढपाळ पोरांना शाळेत घेउन जाण्याच्या सिन पासून होतें. कुठल्यातरी माळ रानावर अशोक आपल्या मेंढरे आणि गोमतर आबा सोबत चारत असतो. तिथे त्याच्या शाळेतील मुले शोधत येऊन, जबरदस्तीने अशोक ला शाळेत घेउन जातात. शाळेत जातांना, अशोक सोबत कॅटरीना ला सुद्धा घेउन जातो. कॅटरीना म्हणजे अशोक ची लाडकी मेंढी... मिंढ्या मागे असल्या कारणाने, अशोक च्या अंगाला लेंड्या मुताचा वास असतो, ते पाहून त्याचे सहकारी जबरदस्ती अशोक ला हापशीच्या तोंडा खाली अंघोळी घालतात... शाळेत बसताना सोबत आणलेली कॅटरीना आणि इतर विद्यार्थ्यांचे हसणे....अशोकला बुजाडून टाकतात....


स्थायी समाजात सामावून घेतांना,मेंढपाळांच्या लेकरांना कायम उपरे पनाची जाणीव करून दिल्या जाते ,आणि त्यांचाही लाजरे बुजरे पनाचा, स्वभाव त्यांना सहज मिसळू देत नाही.  


 चित्रपटाची खरी रंगत ' परेड ' पासून सुरू होते.  गणतंत्र दिनानिमित्त शाळेमध्ये झेंडा वंदनाची परेड कवायत सुरू असते... तिथे अशोक आपली मेंढी सोडून, बघायला जातो. साळा सुटल्या वर अशोक मेंढी ला घेऊन, निघणार तोच त्याला परेड होताना दिसली. त्या कवायतीला बघण्यासाठी अशोक जातो. तिथे बाळू पाटील नावाचा विद्यार्थी परेड ला लीड करीत असताना, परेडच्या घोषणा देतो. त्या घोषणांचा बेरकी आवाज ऐकून , अशोकला अचानक  हसू फुटते.  त्या हसण्याचा भारी राग गुरुजी ला येतो आणि मग गुरुजी... अशोकलाच परेड करायची सूचना देतो .


रानावनात मेंढपाळ पोरांना आणि बायांना आरोळ्या ठोकण्याची कौशल्ये जबरदस्त असतात. जंगलातील दोन खोऱ्याचे अंतर सहज कापून काढतील, जंगलाला कापरे भरतील अश्या आरोळ्या मेंढपाळ सहज देतात.


अशोक ने मिळालेल्या संधीचा फायदा घेतला अन् शाळेची कोपरे कोपरे जागे होतील.... अशी प्रचंड घोषणा रुपी आरोळी दिली.  आवाजाने मास्तर ने थुंका गिळला असावा तर हेड मास्तर डायरेक्ट मैदानावर येऊन अशोक ची पाठ  थोपटवून बोलले की, "कोण रे तू ? कुठे होता ?याला लीडर करा ".


मेंढरं चारणारा पोरगं  लीडर बनणार हे ऐकून गुरुजींचं अवसान गळाले अन मग " ह्यो कुठे शाळेला येतो, ह्यो माळावर च असतो' वगैरे म्हणून गुरूजी  कसा बसा वेळ मारून नेतो. 


इथून अशोक, बाळू पाटील आणि मास्तर यांच्या भोवती चित्रपट सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे चित्रण मांडतो. गुरूजी हेड मास्तर ला समजावून सांगतो की, हा रोज शाळेत येणार नाही , हा मेंढरे घेउन रानात जातो... पण हेड मास्तर अशोक च्या आवाजाने आकर्षित होतात , अन त्याच्या कौशल्यावर विश्वास ठेवून रोज शाळेत ये असे बजावतात. अशोक चा नुकताच झालेला मुस्लिम मित्र सुद्धा ,  'लीडर तूच होणार  पण रोज शाळेत यावे लागेल' असे अशोक ला बजावतो.


त्यावर अशोक " अन् मग मेंढरं?"  असा सवाल करतो . मेंढरे वळायची की शिक्षण घ्यायचे ? हा सध्यस्थितीत मेंढपाळ मुलं मुलींसमोर भेडसावत असलेल्या प्रश्नाने मला ही स्थंबित केले.




शाळा की मेंढरे? या द्वंद्वात मदत करायला पुढे येतो तो गोमतर आबा . गोमतार म्हणजे गोमुत्र, असे नाव कसे पडले ?. हा प्रश्न अशोक ने विचारल्यावर, "माया जल्म गण तंत्र दिवस की काय त्याला झाला व्हता म्हणून गणतंत्र ठेवलं, पण त्याचं गोमतर झालंय". 


एवढ्या सोप्या शब्दात आपल्या उत्पुत्तीचे मूळ गोमतर आबा सांगून, मेंढपाळ नवे धोंडू, दगडु, घमा, यमा, पावसू, नागू, मांगु, चिमा, यसा वगैरे कशी काय पडतात. याचा सिद्धांतच मांडून टाकतो.


मेंढरं चारणारा 'आपली लीडर ' ची जागा घेतो, हे बाळू पाटील ला सहन होत नाही, अन् मग बाळू पाटील अशोक वर शाब्दिक, शारीरिक मार द्यायला लागतो. 


"मेंढरे सोडून शाळेत येतो का? माझी जागा घेतो का? तू लीडर व्हणार हाय का?" वगैरे शब्दिक कोट्यांनी अशोक बेचैन व्हायला लागतो. सोबतच शाळेतील इतर कुठल्याही मुलाचा पाठिंबा , सोबत अशोक ला मिळू नये. याचीही तजवीज बाळू पाटील करून ठेवतो.


'लीडर असणे ' हा जणू आपला पिढीजात आणि जन्मजात अधिकार असल्याच्या आविर्भावात बाळू पाटील वागत असतो. पण आपल्याला मिळालेली संधी ही कर्तृत्वाने आणि संघर्षाने मिळालेली आहे, याचे भान असलेला अशोक मेंढपाळ हे सगळे वार झेलून  गपगार न राहता पेटून उठतो...


बाळू पाटलांनी अशोक ला परेड शिकण्याची संधी कुणाकडून मिळू नये . याची व्यवस्था केल्यावर, परेड गावातील कुणाकडून तरी  शिकण्यासाठी अशोक व्याकुळतेने शोध घायला लागला.  कधी गावात सैन्यात असलेला मेजर असो की पोलिस, आर्मी भरती मारणारी तरुण असोत.. सर्वांना विनवणी करायला लागला .


एक दिवस  खचित होऊन शांत गोमतर आबा जवळ जाऊन रडतो. सिध्दार्थ (बुद्ध ) ज्या सत्यासाठी व्याकूळ होऊन, राज दरबार सोडून हिंडत राहिला होता. त्या व्याकुळतेणे आपल्या हक्काच्या लीडरशिप साठी... अशोक व्याकूळ झाला होता. जेव्हा कुठलाच पर्याय त्याला भेटत नाही.... त्यावेळी आन्या ची भेट होते. अन्या म्हणजे अमर देवकर यांचा रोल.




" दुश्मन आपल्या आतच आहे"


अन्या तसा वेडसर असलेला सैनिक म्हणून चित्रपटात दाखविलेला आहे. त्यामूळे अन्या नेहमीच सैनिकी रुपात असतो.... "  दुस्मान आपल्या आत च आहे" हे अन्या चे वाक्य किती तरी अंगाने लागू पडते.


एकाच वेळी देशातील गद्दार लोकांसाठी तर दुसरी कडे, समाजातील उच्च निम्न उतरंडी जोपासणाऱ्या, इतरांच्या संधी नाकारणाऱ्या बाळू पाटील मानसिकते मध्ये दिसून येते. जो पर्यंत ही भेदभावाची सिडी तुटत नाही, तो पर्यंत या देशात लोकशाही योग्य पद्धतीने नांदू शकणार नाही. हे आंबेडकरांनी केलेले भाकीत, मेंढरे राखणाऱ्या पोराने लीडर होऊ नये.  म्हणून समतेला छेद देणाऱ्या मानसिकतेला अधोरेखित करते.


जाती व्यवस्थेने लहान वयातील बाळू पाटलाला आपण पिढी जात नेते आहोत , हा अहंभाव दिला तर , कर्तबगारी असून सुद्धा संधीची उपेक्षितता आपल्याला लीडर बानू देत नाही  याची जाणीव चित्रपट बघताना आपल्याला येते . 


नंतर अन्या अशोकला रोज योग्य प्रशिक्षण देतो.... येडसर ठरविलेला अन्या, गावातील शहाण्या लोकांपेक्षा लय हुशार आहे याची जाणीव सुद्धा अशोकला होते.  अन सोबतच अशोक मधला लिडर हि सक्षम आणि प्रबळ होतो . 




कोयता - सामजिक शाळेचे उदाहरण.


कोयत्या नावाचा अशोक चा एक मित्र असतो, तो ही रानावनात जित्राबे चारण्याचा व्यवसाय करीत असतो. कोयत्या एका डोळ्याने सपशेल आंधळा असतो, तरीही नेमबाजी मध्ये तो तरबेज असतो. एक दिवस अशोक , कोयत्या अन् गोमतर आबा एकत्र भेटतात. त्यावेळी अशोक गोमतर आबाला सांगतो की कोयता नेमबाजीत लय तरबेज आहे.


आणि कोयत्याही गुल्लेर ने लक्ष्य छेदत स्वतःला सिद्ध करतो. त्यावेळी अशोक , कोयत्याला म्हणतो की ' साळत येत जा ना रं  ' अन् मग कोयत्याही  " आर साळा सिकुन कुणाचं भलं झालं र"असं म्हणून निघून जातो. अश्याच एका दिवशी  शाळेत नेमबाजी बी शिकवतात, तू ये असं जेव्हा अशोक कोयत्याला सांगतो... त्यावेळेस मात्र कोयता आनंदाने  शाळेत यायला लागतो .


धनगर मेंढपाळ मुले मुलींचे शाळेतून गळती मागे काय कारणे असू शकतात, याचा अभ्यास किंवा उत्तर ' कोयत्या' आहे.मी माझ्या आजूबाजूला कित्तेक उदाहरणे पाहिलीत की जी पारंपारिक घोडेस्वारी मध्ये तरबेज होती, विशिष्ठ ठिकाणी खोल डोहाचे पाणी आहे अश्या ठिकाणी गावातील कोणीही जायला धाजवत नाही. अश्या ठिकाणी मेंढ्या चरायला परगावात गेलेला मेंढपाळ पुत्र न भिता डोहात पहून आलेला असतो. कुणी पळण्याच्या तर कुणी कुस्ती मध्ये धस्टपुस्त असलेले, पण शाळेत गणित आले नाही. म्हणून मास्तर ने मारला, किंवा रोज शाळेत जाऊन पाठांतर करणे जमत नाही, अथवा नातेवाईकांच्या घरी घरकाम करावे लागते. म्हणून शाळा सोडून कायमची मेंढरे हाताशी धरलेली जिगरबाज मेंढपाळ प्रवाहापासून फेकल्या गेलेली आहेत. कित्तेक स्त्रियांना ओव्या , स्मरणशक्ती आणि विणण्याची कला अंगभूत होती अन आहे , पण संधीच्या उपेक्षेतेने हि कला  संपुष्टात येत आहे . 


मेंढपाळ किंवा अन्य उपेक्षित पण  हुरहुन्नरी कलेबाज  समाजाच्या वाटेला , त्यांच्या आकांक्षेला सामावून घेणारे  शिक्षणाचे मॉडेल असायला हवे होते . पण  याची गरज ना ही प्रचलित व्यवस्थेला वाटली आणि ना ही समाजातील शासकीय प्रतिनिधींना वाटली. त्याचा परिपाक म्हणजे मेंढपाळ पिढ्या ज्या या देशाच्या विविध क्षेत्रांत ठसा उमटवू शकल्या असत्या, त्या आज जंगलात फक्तं मेंढरे राखत आहेत.




म्होरक्या म्हणजे काय? 


चित्रपटाच्या मध्याला, हरिणीचा कळप पाहून..... अशोक गोम तर आबाला विचारतो की, म्होरक्या म्हणजे काय? त्याचे उत्तर देताना गोम तर आबा उत्तर देतो की जो कळपाला समोर नेतो, वाट दाखवितो, काळजी घेतो.... म्होरं नेतो तो म्होरक्या.... तो म्होरक्या म्हणजे लीडर..गोमतर आबा ने आयुष्यातील 6-7 दशके खर्ची घातलेली असतात, अश्यावेळी म्होरक्या म्हंजी काय याचा व्यवस्थित अंदाज गोमतर आबाला आलेला असतो .  तसा म्होरक्या समाजाला मिळणे आज काळाची गरज झालेली आहे.


स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर सुध्दा,  मेंढपाळ व्यवसाय जगणारा समाज त्याच्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. अश्यावेळी कळपाचे संरक्षण करणारा, कळपाला पुढे नेणारा  तर सोडा पण कळपाचा वापर करून पुढं जाणारी 'वढ्याळ' म्होरपी मोठ्या प्रमाणात निर्माण झालीत , म्हणून मेंढपाळ रोज हलाखीचे जिने जगुत आहे.




चित्रपटाचा शेवट आणि सामाजिक संदेश.


रोजच्या मेंढरं आणि शाळा याची कवायत करीत करीत, तो गणतंत्र दिवस उजाडतो ज्या दिवशी परेड करायची असते. थेट गेम करता आला नाही तर, अप्रत्यक्षपणे हुशारी करून गेम करायचा. हि प्रचलित पद्धत वापरल्या गेली.


बाळू पाटील ने त्याची पाटीलकी पणाला लावून, मास्तरांच्या साहाय्याने डाव टाकला. ऐन वेळी बँड वाजविणारा हात मोडला अन् मग आता बँड वाजवायला कोणी नाही, म्हणून काय करावे? याची चिंता करीत मास्तर नाटक करीत असताना, आपला सिध्द केलेला हक्क, अधिकार सोडून... अशोक ने उदार छातीने सरांची, शाळेची इज्जत वाचविण्यासाठी बँड हातात घेतला .


परेड बघायला आलेल्या गोमतर आबा, वेडसर अन्या अन् लेकाचे कुतुहुल बघायला आलेली अशोक ची आई - आज्जी यांचा अपेक्षा भंग झालेला होता. अशोक च्या लेखी गणतंत्राचे गोमतूरच(गोमूत्र) झाले होते .  आता ही सार्वजनिक क्षेत्रात अश्या अनेक अशोक यांचा गेम अशाच प्रकारे करायचे डाव केले जातात.


पुढे गावामध्ये प्रभात फेरी निघाल्या नंतर , बँड वाजविणारा अनुपस्थित असलेला मुलगा , अशोक आणि त्यांच्या  सहकाऱ्याला दिसतो. त्यावेळी अशोक ला पाटलाची अन् मास्तर ची लबाडी ध्यानात येते...तसा अशोक डोळ्यात आसवे आणून, प्रभात फेरी सोडून, वाड्या कडे निघून जातो....


अशोक अचानक जात आहे हे बघून ,सगळी मुले त्यामुळे गोंधळात पडतात, त्याचवेळी मास्तर सुद्धा अशोक ला जातांना बघतो.


हा क्षण महत्वाचा आहे  , आपण केलेल्या पापाचे थोडीही लाज मास्तर ला वाटत नाही. मास्तर ज्या जाती व्यवस्थेतील सामाजिक स्थाना (social location) मधून येतो, ते स्थान आणि ती जातीव्यवस्था ... मास्तर ला लाज वाटून घ्यावी किंवा आपण काही चूक केले याची जाणीव होऊ न देता " तो येत नसतो शाळेत, शेवटी  मेंढ्याच राखणार" असे म्हणून केलेल्या पापाला योग्य ठरवित असतो.




चित्रपट येथे संपतो का? नाही... चित्रपट याही पुढे आहे..... तो तुम्हाला अमेझॉन प्राईम वर बघितल्यावर कळेल.


पण या चित्रपटाने काही महत्त्वपूर्ण संदेश दिलेत. एक काळ होता , जेव्हा मेंढपाळ आंदोलनातील फक्तं आकर्षणाचे चिन्ह होता. पण जेव्हा आम्ही मेंढपाळ संघटना काढली. तेव्हा माझ्या अनेक मित्रांनी मला मेंढराचा नेता म्हणून हिणवले होते, अजूनही हिनवतात. धनगर समाजातील अनेक उच्चभ्रू लोकांनां मेंढपाळ ' आमच्यातले ' आहेत. हे सांगताना संकोच वाटतो. पण ज्या दमाने आम्ही मागील काही वर्षात मेंढपाळ प्रश्न लावून धरला, त्याचे फलित म्हणजे आज मेंढपाळ समूहाचे स्वतंत्र प्रश्न प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या मुखी आहे.


आणि म्हणून चित्रपटाचे समीक्षण खालील प्रसंगावर समाप्त करतो . 


बाळू पाटील जेव्हा अशोक ला " अय मेंढराचा लीडर" म्हणून हिणवत असायचा, अन् त्या चिडवण्याला एक दिवस अशोक ने " हाय मी मेंढरांचा लीडर" म्हणून स्वाभिमानी उत्तर दिले. तो सीन माझ्या काळजाला स्पर्श करून गेला.



सौरभ हटकर

प्रदेश अध्यक्ष - मेंढपाळ पुत्र आर्मी.

तथा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) येथील संशोधक विद्यार्थी आहे.

9604079143

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...