भाकरीचा चंद्र की चंद्रावरची भाकर....??


.....अन भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली. ही  नारायण सुर्वेंच्या कवितेतील प्रसिद्ध ओळ आहे..जी भूकेचं तत्वज्ञान मांडते.
अर्थात कोरभर भाकरी की पोटभर भाकरी हा विद्वानांच्या निकषाचा व अभ्यासाचा प्रश्न असू शकेल .पण भारतात आजही 14% लोकं आपल्या भूकेशी लढतांना दिसत असतांना,प्रत्यक्ष चंद्रावर जाऊन भाकरी भाजण्याच्या स्वप्नाचे स्वागत करतांना अनेक प्रश्नचिन्ह उभी राहतात.

भारत हा  अनेक विसंगतीचा देश आहे,वरून मोसंबी सारखा एकजूट दिसलेला भारत.आत शिरलं की त्याच मोसंबीच्या फोडांसारखा जात,धर्म,प्रांतात विभागलेला  दिसतो.

प्राचिन काळापासून भारतातून परदेशात व्यापार व्हायचा,त्या व्यापारात कपड्याचा व्यापारही असायचा. मोठ्या प्रमाणात कापड उत्पादक असलेला देश मात्र विशिष्ट लोकांनीच अंगभर कपडे घातली पाहिजेत या साठी आग्रही अन विशिष्ट समाजातील स्रीयांना स्तन झाकण्याची परवानगीही देत नसायचा...
आजही अनेक विसंगती मधे असणारा माझा देश..एकीकडे भूकीच्या भाकरीसाठी मरतोय तर दुसरीकडे चंद्रावर जाऊन भाकरी भाजण्यासाठी , अर्थव्यवस्थेचा विकास ट्रिलियन मधे होणार अशा अविर्भावात जगतो आहे.हे जे विकास विसंगत भारताला जे महासत्तेचे डोहाळे लागलेत(अवकाश,मिलिटरी,आर्थिक)ते मात्र सर्वसमावेशक का नाहीत??हा खरंतर मला पडलेला प्रश्न आहे.

FAO  या अंतराष्ट्रीय संस्थेच्या रीपोर्ट नुसार भारतातील 195 दशलक्ष लोकं  योग्य व  पोषक पोटभर अन्न मिळवू शकंत नाहीत.उद्याचे भविष्य ज्या सदृढ बालकांच्या खांद्यावर असणार आहे,त्या बालकांना व त्यांच्या आयांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे ते मुलं कुपोषित होत आहेत.
देशातील जवळपास 38% मुलं स्टंटेड(म्हणजे वयाला अनुसरून शरीराची वाढ न होणे)चा शिकार झालेली आहेत.
21% बालकं अंडरवेट म्हणजे वयानुरूप वजन नसलेली आहेत....हे त्या भारतात होत आहे ज्याची economy  जगातील 5 वी मोठी इकाॕनाॕमी आहे..हे त्या भारतात होत आहे.जो दुध,दाळी,म्हशीचं मांस,केळी,आंबा उत्पादनात प्रथम ,
तर गहू,तांदूळ उत्पादनात जगात द्वितीय क्रमांकावर आहे.
हे त्या भारतात होत आहे ज्याचं चंद्रयान-2 चंद्रावर जाऊन पाणी शोधून येणार आहे....
हे विचित्र आहे पण सत्य(कटू)आहे....!!

मग अर्थव्यवस्था वाढू नये का??चंद्रयान जाऊ नये का??
तर नक्कीच ...चंद्रयान जावं..संशोधन क्षेत्र वाढावं...नविन संशोधन सुद्धा व्हावं..ते देशासाठी गरजेचं आहे...कल्पना आणि उत्सुकतेच्या भरार्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजेत......विकासही व्हावा...अर्थव्यवस्थाही वाढावी.. अन ती वाढलीही सुद्धा पण आज जेव्हा भारत विकसित देशांच्या स्पर्धेत उतरून स्वतःला आर्थिक,अवकाश,मिलिटरी बाबतीत स्वतःला महासत्ता करू इच्छित असतांना.....मुक्काम पोष्ट कधी या पुलाखाली कधी त्या पुलाखाली,कधी या गावात कधी त्या गावात,कधी या झोपड पट्टीत कधी त्या झोपड पट्टीत तर कधी जंगलातून हाकलून शहरांच्या अस्वच्छ अंगणात असणार्यांच्या जगण्याचा निफ्टी, जेवढ्या वेगानं चंद्रयान किंवा ट्रिलियन इकाॕनमी वाढत आहे.
तेवढया वेगाने का वाढत नाही....?? हा खरा प्रश्न आहे...
1991 चे खाऊजा (LPG)धोरण देशावर अरीष्ट आले म्हणून स्विकारले गेले आणि स्वप्न दाखविलेत सर्वांगिण विकासाचे.
मग झाला विकास?? खरंतर अशी अरीष्ट फक्त जे आधीपासून सुस्थितीत आहे त्यांच्यावर आली की ती देशांवर आलेली संकटं ठरविली जातात..म्हणजे 1991 साली काही दिवस चालेल एवढेच तेल उरले आणि आखाती देशातील परकीय चलन देशात येऊ शकत नाही म्हणून अर्थव्यवस्था धोक्यात आली...
मग आपण IMF  सारख्या जागतिक संस्थेकडुन मदत घेऊन,अर्थव्यवस्था चांगल्या अवस्थेत आणली असा गाजावाजा केलांय.
आकड्यात वाढलेली अर्थव्यवस्थेची वाढ पाहिली की कुणीही विद्वान ते नाकारणारही नाही....पण त्या LPG धोरणातून झालेला विकास किती सर्वसमावेशक झालांय???

खरंतर विकासही मुठभर जणांनाच झालांय ज्यांचे अस्तित्व 1991 साली धोक्यात आलं होतं त्यांचाच....हे आर्थिक सुधारणांच्या 28 वर्षानंतरही OXFAM नावाच्या संस्थेचा रिपोर्ट पाहिला की  दिसतोच आपल्याला .....
मुद्धा हा आहे की 1991 च्याही कितीतरी आधी पासून जे गरीब होते....द्रारीद्र्यात होते...त्यांना LPG धोरणांचा काय फायदा झालांय?? त्यांच्या आयुष्यात विकासाची फळं का पडली नाहीत?? यावर जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेच्या देशामधे चिंतन व्हायला हवे...

देशाच्या धोरण निर्मात्यांच्या शब्दकोशात जर 'लोककल्याणकारी' हा शब्द 2002  साली उजाडत असेल...अन आतापर्यंत तो फक्त लेखामधे,धोरणांच्या रिपोर्ट मधे अलंकारीत म्हणूनच वापरल्या जात असेल तर आमच्या विकासाच्या माॕडेलची पुनःर्मांडणी होणे गरजेचे नाही वाटत का??

भारताचे चंद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण बाजूवर उतरणारं जगातलं पहिलं यान ठरणार आहे.हे भारतासाठी भूषणावह असेल,पण मानवी विकासाबाबत भारत निदान पृथ्वीच्या जमिनीवरतरी  असायला पाहिजेत.
गरीबी अन चंद्रयानाची तुलना करता येते की नाही? हा चर्चेचा जरी विषय असला तरी...चंद्रयानाच्या प्रासंगिकतेवर तो अनेकांसाठी अस्तित्व,उदरनिर्वाहाचा विषय आहे.....
पिढ्यांपिढ्या भाकरीच्या चंद्रासाठी तरसणार्या त्या 14% भारतमातेच्या सुपुतांना ,चंद्रयान2 च्या उड्डानावेळी उत्सर्जित झालेल्या उर्जे ऐवजी,ओस पडलेल्या चुलीवर एकवेळचं अन्न शिजविण्यासाठी पेटणारी उर्जा महत्त्वाची   आहे....
चंद्रयान-2 मधील विक्रम लँडर चंद्रभूमीवर लँड करण्याच्या आनंदाऐवजी,ज्यांना पोटातील भूमीवर दोन घास लँड होणे जास्त महत्त्वाचे  आहे..

अशांच्या आयुष्यातील अंधाररात्री नष्ट करून..कल्याणकारी उजेड आता  आणला पाहिजेत..म्हणजे मग त्यांना त्या अंधारात भाकरीचा चंद्र शोधण्याची धडपड करावी लागणार नाही.अन ते ही आनंदाने चंद्रयानाचे उत्सवात सर्वांसोबत सहभागी होतील....

सौरभ हटकर
खामगांव,जि बुलढाणा9604079143

Comments

  1. खरंच खूप छान लिहतोस तो....आणि त्याचे विश्लेषण सुद्धा खूप मस्त आहे. असेच समाजबद्दल जाणीव असलेले लिखाण करत रहावे हीच अपेक्षा...

    ReplyDelete
  2. देश प्रगती करतोय तो करणारच. पण त्याहूनही बिकट आणि त्यातल्यात्यात महत्वाच्या बाबींकडे आपण दुर्लक्ष करतोय हे नक्की.
    Lpg धोरणाने भारत नेमक्या कोणत्या दिशेने वळला याच विश्लेषण करून आपण तेंडुलकरांच्या कॅलरी निकष याकडे निरखून पाहणे गरजेचे आहे. अन्यथा लोकसंख्येचा लाभांश असला तरी ती लोकसंख्या सुदृढ आहे का हा विचार करणे काळाची गरज आहे!

    ReplyDelete
  3. खरंतर मला कालच यावरती प्रतिक्रिया द्यायची होती पण जमले नाही....

    वरील पत्रात खुप सखोल ऊत्तर दिले आहे ते आपल्या देशात पण लागू होते....

    जेव्हा ईस्रोची, आयआयटी, आयआयएम, ऐम्स् ची स्थापना झाली तेव्हापासून हा प्रश्न विचारायला सुरुवात केली लोकांनी की एवढं खर्च का करावा संशोधनांवरती. याआधीही म्हणजे प्रागैतिहासिक काळापासूनच भाकरीसाठी संघर्ष चालू होता व आहे. पण मानवकल्याणार्थ या अवकाश मोहीमांतून खुप काही गोष्टी संशोधक, शास्त्रज्ञ संशोधलील हुडकून काढतील हे नक्की.....

    ईस्रोनी बाकी कितीतरी अवकाश संस्थांपेक्षा कैक पटींनी मोहिमेवर खर्च कमी केलेला आहे. चांद्रयान २ वा मंगळयान हे हाॅलीवूड च्या चित्रपटाच्या एकूण खर्चापेक्षाही कमी खर्चात साकारल्यात आपल्या शास्त्रज्ञांनी....

    त्यामुळे अश्या शंकाकुशंका सोडून आपणच आपल्या शास्त्रज्ञांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे....

    धन्यवाद...

    ReplyDelete
  4. "अवकाश भरारी कशासाठी?"

    १९७० साली झांबिया स्थित चर्च मधील सिस्टर मेरी युकांडा यांनी नासाचे डॉ अर्न्स्ट स्टालींगर यांना एक पत्र लिहिले जे त्यांच्या मंगळयान मोहिमेच्या संशोधना संदर्भात होते. सिस्टर मेरी यांची विशेष करून डॉ स्टालींगर यांना अशी विचारणा होती की भूतलावर असंख्य बालके कुपोषित असताना, नासा मंगळ यान संशोधन आणि मोहिमेवर अगणित डॉलर्स खर्च करायचे धाडस कसे करू शकते?

    थोड्याच दिवसात डॉ स्टालींगर यांनी सिस्टर मेरी यांना खालील पत्र लिहिले सोबत त्यांनी अंतराळवीर विल्यम अँडर्स यांनी 1968 साली चंद्रावरून पृथ्वीचा "अर्थ राईज" (Earth Rise) नाव दिलेला अद्भुत फोटो पाठवला. या पत्राला त्यांनी "अवकाश भरारी कशासाठी" ( why explore space ?) असे नाव दिले. हे पत्र नासाने नंतर प्रकाशित केले. ते पत्र पुढीलप्रमाणे ....

    ६ मे १९७०

    प्रिय सिस्टर मेरी,

    मला अनेक पत्रे मिळाली ज्यापैकी एक तुमचे होते. तुमच्या पत्राचा आशय मला खूप सृजनशील आणि सयुक्तिक वाटला म्हणून मी तुमच्या पत्राचे उत्तर प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न करीन.

    सर्व प्रथम मला तुमचे आणि तुमच्या इतर सर्व संयमशील सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत ,कारण की तुम्ही तुमचे पूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी झोकून दिलेले आहे.

    तुम्ही तुमच्या पत्रात भूतलावर असंख्य बालके कुपोषित असताना मंगळयान मोहिमेवर एवढा अगणित खर्च कशाला असा प्रश्न विचारलात, माझ्याकडून " जेव्हा असंख्य बालके पृथ्वीवर कुपोषणामुळे मरत आहेत तेव्हा मी अवकाश संशोधनावर वायफळ खर्च करणार नाही " अशा उथळ उत्तराची तुम्हाला नक्कीच अपेक्षा नाही. वस्तुतः मंगळयान भरारी शक्य होण्याच्या कित्येक वर्ष आधी कुपोषित मुले आणि त्यांचं आयुष्य मी जवळून अनुभवलेलं आहे. तरीही माझ्या असंख्य मित्रांप्रमाणे माझा सुद्धा या गोष्टीवर विश्वास आहे की मानवाचे चंद्रावर आणि मंगळावर पोहोचणे गरजेचे आहे आणि शुभस्य शिघ्रम !

    यामुळे पृथ्वीवर असलेल्या अनेक बहुचर्चित आणि दीर्घकालीन समस्यांचे निरसन होण्यासाठीच मदत होईल...

    ReplyDelete
  5. जर मानवाचे जीवनमान सुधारायचे असेल तर आणखी नवीन तंत्रज्ञान शोधण्याची अमूल्य गरज आहे. आपल्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र यात अधिक संशोधनाची गरज आहे. ज्यातून मानवाला भूकबळी, गरीबी, कुपोषण, प्रदूषण अशा जटिल समस्यांवर उपाय मिळेल. याकरिता जास्तीतजास्त तरुण-तरुणींनी संशोधन क्षेत्रात झोकून देऊन करिअर करण्याची गरज व संधी सुद्धा आहे.

    अवकाश संशोधन हे एका वटवृक्षाप्रमाणे सर्व शाखारुपी संशोधनाची संधी व उपायानांरुपी सावली देते.

    अमेरिकन सरकारने ज्या ज्या गोष्टींसाठी निधी ठरविला आहे व ज्यांचे काम ठळकपणाने दिसून येते त्यात अवकाश संशोधन व मोहिमा यांचे नाव आग्रहाने व अभिमानाने घेण्यासारखे आहे. ही गोष्टसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की अवकाश संशोधनावर होणारा खर्च एकूण अर्थसंकल्पाच्या १.६% टक्केच आहे. नवीन संशोधनाचे उत्तेजक व मध्यस्थ असणारे हे काम अतुलनीय आहे. याच अनुषंगाने मी हे सुद्धा म्हणण्यास कचरणार नाही की अवकाश संशोधनाने मागील तीन चार हजार वर्षांच्या युद्धखोर इतिहासाला सुद्धा मागे टाकले आहे.

    देशादेशांतील स्पर्धा युद्धसामग्री, बॉम्ब, बंदुका बनवण्याऐवजी मंगळयान, चांद्रयान बनवण्यात लागली तर केवढा नरसंहार टळेल या कल्पनेने सुद्धा मन सुखावते. ही स्पर्धा शक्तिवर्धक आणि समृद्ध भविष्याची नांदी ठरेल!

    अवकाश संशोधनाचे वरपांगी स्वरूप बहिर्मुख वाटले तरी ते पृथ्वीच्या उद्धाराचेच आहे. पृथ्वीचे व पर्यायाने मानवाचे वर्तमान व भविष्य सुधारण्यास ते हातभार लावेल.

    मी सोबत जोडलेला फोटो हा आपल्या अतिप्रियतम पृथ्वीचा चंद्रावरून घेतलेला फोटो आहे. पृथ्वीचा आजवरच्या इतिहासातील हा नक्कीच अभूतपूर्व क्षण होता. या फोटोमुळे ही पृथ्वी आपली आहे, माझी आहे आणि ती सुंदर आहे तथापि यावरील समस्या किती गहन आहेत आणि कठीण आहेत याची जी दुर्दैवी जाणीव अधिकाधिक लोकांना झाली.

    हे अवकाश पर्व आपल्यासमोर प्रश्नांचा आणि त्यातच दडलेल्या उत्तरांचा एक आरसा घेऊन उभे ठाकले आहे. समस्यांशी दोन हात करण्याचा आशावाद पण याच अवकाश पर्वाने दिला आहे. अल्बर्ट श्र्वैत्झर यांनी एके ठिकाणी असे म्हंटले आहे "मी भविष्याकडे काळजीने पण सकारात्मक अपेक्षेने बघतो" अवकाश पर्वाने देखील आपल्याला हेच शिकवले नाही का !!

    माझ्या शुभेच्छा तुमच्या व तुमच्या मुलांच्या बरोबर कायमच राहतील !

    सदैव तुमचाच

    डॉ स्टालींगर.
    असोसिएट डायरेक्टर ऑफ सायन्स
    ( पत्र स्वैर अनुवाद - सौरभ वीरकर )

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .