'अनहायजेनिक' गावाचं हायजेनिक प्रेम.


(कथा पुर्ण वाचली पाहिजेतंच)

खरंतर सुमन ला गावाकडच्या सासर ला जायचा कंटाळाच यायचा....
उन्ह्याळ्याची सुट्टी लागली की पहिली धडधड सुमनला वाटायची,ती याचीच की आता गावाकडे जायचंय.......
तीची चिडचिड अजय ला स्पष्ट जाणवायची.....
तरीही अजय तिच्या बोलण्याला फारसा गंभीरतेने न घेता एक दोन दिवसांकरीता का होईना....लेकरांनासोबत घेऊन गावांत जायचा.

अजय सुमनचा नवरा....दोघेही एकाच कंपनीत नौकरीला होते....तिथे दोघांचं प्रेम आणि प्रेमाचं नंतर लग्नात रूपांतर झालं.
अजय ग्रामिण भागातला होतकरू तरूण होता....
त्याने शिवार-वावारापासून आपला प्रवास हिंजेवाडीच्या चकचकीत इमारती पर्यंत केला होता.
तर सुमन ही सावळी पण प्रसन्न रूपाची होती.
तिचं  स्वतंत्र व्यक्तीमत्वाने अजय ला भुरळ घातली होती.
तीच्या निर्णय क्षमतेचा तो दिवाणा होता,
तर अजय च्या नम्रतेने ती दिवाणी झाली होती.
तुलनेने सुमन शहरी असल्याने तिला गावगाडा फारसा कधी रमणीय वाटला नाही.
अगदी तिच्याच शब्दात गावगाडा तीला प्रचंड अनहाईजेनिक  वाटायचा.
म्हणून सुट्ट्या आल्या की ,सुमन ला चिंता वाटायची.ती तिच्या लेकराच्या म्हणजे राहूल च्या आरोग्याची.

गावामधे गेल्यावर अजय चे आईवडील सुमन-अजय च्या लेकाला अन त्यांच्या नाताला म्हणजे राहूलला जवळ घेऊन खेळवित असंत.प्रेमाने त्याचे मुके घेत असीत.
कधीकधी आजी आपल्या चंचईतलं पान काढून राहूलला खायला द्यायची.
काताने लाल झालेलं तोंड घेऊन,राहूल त्याच्या मम्मी ला कौतुकाने दाखवायला जायचा.तर मम्मी त्याच वेगाने त्याच्या पाठीवर रपाटा देत.कशाला खाल्लंस ?म्हणून रागवायची.
अन मग क्रोधाने अजय कडे बघायची.

राहूलचे आजोबा त्याला  खांद्यावर घेऊन गावांत फिरवून आणायचे.
अनेक गोष्टी सांगायचे..कधी कधी आजोबा कुणावर चिडले तर शिव्याही द्यायचे...

राहूलला मात्र गावगाडा आपलांसा वाटायला लागला होता....
2BHK flat च्या समोर खुल्या अंगणाच्या घराची श्रीमंती त्याला प्रचंड वाटायची.
सडा सावरण अन त्यावर रांगोळी हे चित्र राहूलने कधी त्याच्या अपार्टमेंट मधे पाहीलंच नव्हतं.
रात्री मोहल्ल्यातील सर्व येऊन एकत्र बाजीवर बसून गप्पा मारणे,खेळणे ही तर त्याच्यासाठी मेजवाणी असायची.
म्हणून जसा तो गावांत येई....मनसोक्त खेळंत असे.....त्याचा एक मित्र होता.रम्या.
रम्या म्हणजे अजय च्या मोठ्या भावाचा लेक.रम्या राहूल ला खेळविंत असे...
त्याला नदीवर घेऊन जाणे....टायर-चक्का शिकविणे.....क्रिकेट चा नाली मधे पडलेला बाॕल मातीवर घोळून,पुन्हा खेळणे,झाडावर चढणे वगैरे खेळ तो त्याला शिकवित असे.
कधी कधी राहूलला राग आला की तो इतर मुलांना ईडियट म्हणायचा,गावातल्या पोरांना एकतर ती शिवी वाटतंच नव्हती...अन वाटलींच तर पार हायब्रिडचं पानचट बियाणं वाटायचं.
म्हणून रम्यानी राहूलला अस्सल झणझणीत दाण्यावरून-ते-घोडा,बैल,उभ्यानी-आडव्यानी पर्यंतचे 'करायचे' शिव्याप्रकार शिकविले होते.
याचा परीणाम म्हणून कधी कधी राहूलच्या तोंडून एखादी शिवी घरातंच बाहेर पडायची.
तेव्हा मात्र सुमनचा प्रचंड रागाने तिळपापड व्हायचा.

पुण्यात क्षणभर जरी राहूल बाहेर गेला की आल्या आल्या सुमन त्याचा हँडवाशने हात धुऊन,त्याला ग्लुकोज प्यायला देई.
इकडं रम्या दिवसभर लोळून आलाकी,डायरेक्ट बाहेरच्या टमरेलातील असलं तर, अर्धा गिलास पाणी हातावर टाकी.
 नाहीतर तसंच त्याच हाताणी राजणांत हात बुडवून,गटागटा त्याच गिलासानी पाणी प्यायचा.
म्हातारंही बाहेरून आलं की तसंच जेवायला बसायचं.
ते सुमन ला प्रचंड अनहाईजेनिक वाटायचं.
ती अजय ला तसं बोलून ही दाखवायची.
सुमनला ही सगळी माणसं राहूलच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत असं वाटायचं.
"माझ्या राहूलच्या जिवाला यांच्यापासून धोका आहे" असं  ती अजय ला नेहमी म्हणत  असायची.
 अजय ची ही आता गावगाड्याची ओढ कमी झाली होती.
लेकरावर वाईट 'संस्कार' पडतात,म्हणून त्यानेही मागील काही वर्षापासून गाव सोडुनंच दिलं होतं.

तर तिकडे उन्हाळा लागला की म्हातारी-म्हातार्याला राहूलची आठवण छळायची.
मग ती कधी शेजार्या-पाजार्या कडून फोन लावून,अजय ला ये म्हणायची.
अजय कधी मिटिंग मधे आहे तर कधी यंदा राहूलला स्विमिंगचा क्लास लावला असं सांगून टाळायचा.
बिचारी म्हातारी-म्हातारं तसंच वाट पाहत झुरायची.
सुरूवातीला प्रत्येक   दिवाळी-उन्हाळ्याला येणारा अजय आता 4-5 साल झालं तरी आला नव्हता.

गावकर्यांचं भौतिक वागणं जरी त्यांच्या संज्ञेत 'अनहाईजेनिक' असलं तरी,रम्या-म्हातारी-म्हातार्याच्या आंतरीक भावन ह्या निर्मळ अन प्युयर हाइजेनिक आत्मियतेच्या होत्या.त्या भावनांची  किंमत कदाचित त्यांना त्यांच्या भांडवली बाजाराच्या  आॕनलाईन स्टोअर वर कधीही दिसली नसावी.
म्हणून त्यांना  ते प्रेम बिनमोलाचं भासंत होतं.

पण.... अचानक एकेदिवसी अजय-सुमन राहूल ला घेऊन न सांगता गावांत आले.
त्यांना अचानक आलेलं पाहून,
म्हातारी-म्हातार्याचा आनंद गगनात मावेना.
त्यांनी आल्या आल्या राहूल चे पटापटा मुकं घेतले.
अजय च्या तोंडावरून हात फिरवून,'लय दिसानं आलांस रं लेका,वाट पाहू पाहू जिव पार खोल गेल्ता बघ'.असं म्हणून 'सुमने जरा खात पित जा की,किती बारीक झालींस'असं म्हणत म्हातारीनी त्यांची नजर उतरविली.
सुमन ही लगबगीनं घरात घुसली होती.
नेहमी प्रमाणे ती रागात नव्हती,तर एक प्रकारची सुरक्षितता तिच्या चेहर्यावर रेंगाळत  होती.
अजय सुद्धा प्रसन्न भासंत होता.
आपण गावांत आलो अन घरातल्यांनी ज्या तत्परतेने आपलं स्वागत केलं.ते पाहून ते आतल्या आत खजिल झाले होते.

कारण त्या दोघांच्याही गावात येण्याच्या आंतरीक भावना रम्या,म्हातारी-म्हातार्या प्रमाणे  हाईजेनिक नव्हत्या,तर त्या कोरोना च्या भयाने, जीव वाचविण्याच्या स्वार्थाने अनहाईजेनिक झालेल्या होत्या.

सौरभ हटकर
खामगांव जि बुलढाणा
9604079143
9325462499

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

06 Dec...